त्रिंबक लक्ष्मण तथा बापूराव केतकर
- rohan170699
- 2 days ago
- 2 min read

प्रसंग १ - साधारण ८०-९० वर्षांपूर्वी, स्थळ - टिळक स्मारक मंदिर, पुणे
खचाखच भरलेले प्रेक्षागृह, साध्या वेषातील एका गायकाची ठुमरी, सुनी हो बालम मोरा...' आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट...
प्रसंग २ - १७ ऑक्टोबर, १९९८, स्थळ - टिळक स्मारक मंदिर, पुणे
भास्करबुवांच्या जयंतीदिनी 'मधुसंचयन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, तसेच खचाखच भरलेले प्रेक्षागृह, देशकार रागातील ध्वनिमुद्रिका 'न ते हरि नाम लेत...', तसाच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट...
प्रसंग ३ - २५ ऑगस्ट, २०२५, स्थळ - बैठक फाउंडेशनचे कार्यालय
संगीताचा एक चाहता दुर्गा रागातील ध्वनिमुद्रिका 'आज मिले नंदलाल...' ऐकतो, आणि त्या गायकाच्या गाजदार, गोड आवाजाचे आणि निर्मळ गायकीचे होत जाणारे गारूड...
भिन्न स्थळ-काळ, प्रसंग, श्रोतृसमुदाय, परंतु,गायकीतील तेज तेच, 'असर' तोच, आणि गायकही तोच... त्रिंबक लक्ष्मण तथा बापूराव केतकर. आपल्या अवघ्या ५४ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला.
संगीताचा समृद्ध वारसा...
पणजोबा रामकृष्णबुवा, खर्ज गायनात निपुण, खर्जे केतकर म्हणून प्रसिद्धी असलेले आजोबा बळवंतराव, तर रामदुर्गच्या संस्थानात दरबार गायक असलेले ध्रुपदीये वडील लक्ष्मणराव असा समृद्ध सांगितीक वारसा लाभलेले त्रिंबक तथा बापूराव जन्मतःच संगीत घेऊन आले.
वडील ध्रुपदिये असून बापूरावांनी ख्यालगायकीत मिळवलेल्या सिद्धीचे गमक हे त्यांच्या विद्यार्थीदशेत घडलेल्या २ प्रसंगात दडलेले आहे. लहानपणी त्यांनी एकदा मरहूम उ. अब्दुल करीम खान यांचे गायन ऐकले. त्यांच्या मनी ख्याल गायकी शिकण्याची इच्छा निर्माण झाली. पुढे त्यांना प्रत्यक्ष ती तालीम मिळू शकली नाही. पुढे एकदा मास्तर कृष्णाराव यांची एक मैफिल त्यांनी ऐकली. त्यांनी मास्तरांकडे गायन शिकण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु मास्तरांनी त्यांना भास्करबुवांकडे जाण्याचे सुचवले. त्याप्रमाणे भास्करबुवा आजारी पडेपर्यंत ३-३.५ वर्ष त्यांना तालीम मिळाली. मुळातच संगीताची जाण असल्यामुळे कमी कालावधीत देखील बापूरावांनी भास्करबुवांची गायकी उचलली. भास्करबुवांच्या पश्चात त्यांची गायकी कोणी पुढे नेली असेल, तर ती बापूरावांनीच.
गुरुवर्य बापूराव...
आपल्या तरुणपणात त्यांनी मैफिलीचे गायक म्हणून भरपूर लौकिक मिळवला. परंतु आपल्या गुरुचे स्वप्न भारत गायन समाज या संस्थेप्रती त्यांनी आपल्या आयुष्य समर्पित केले. त्यामुळे दुर्दैवाने अतिशय उत्तम गायकी असूनदेखील त्यांना म्हणावी तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. अभिनेत्री इंदिरा चिटणीस, सुलोचना पालकर, माधवराव शिंदे, श्रीराम वैद्य, पंडितराव नगरकर, एकनाथ ठाकूरदास, योगिनी जोगळेकर असा फार मोठा शिष्यवर्ग त्यांनी तयार केला. प्रसिद्ध हार्मोनियमपटू बाळ माटे यांना ऑर्गनवादनाचे शिक्षण देखील बापूरावांनीच दिले. कराचीतील सेठ लखमीचंद ईसरदास नारंग यांनी त्यांना संगीतशिक्षणाकरिता काही काळ आपल्या जवळ ठेवून घेतले होते.
गायक-नट बापूराव...
१९२५ ते १९५२ या काळात बापूरावांनी संगीत रंगभूमीवर देखील स्पृहणीय काम केले. संगीत संशयकल्लोळ मधील 'अश्विनशेठ' ची भूमिका विशेष गाजली. त्यांच्या 'मानिली आपुली, मृगनयना रसिक मोहिनी' ही पदे विशेष रंगत आणि हमखास वन्स मोअर घेत असत. अतिशय देखणे व्यक्तिमत्व, अनुकूल आवाज, आणि उत्तम गायकी यामुळे बापूरावांची गायक नट म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली.
संगीतकार बापूराव...
त्याकाळातील सर्वच संगीत रंगभूमीवरील कलाकारांप्रमाणे बापूरावांना देखील चित्रपट सृष्टीने खुणावले. नाशिक येथील 'गोदावरी सिनेटोन' व 'सरस्वती सिनेटोन' या कंपन्यांकरीता त्यांनी संगीत दिले. १९३२ साली प्रदर्शित झालेल्या श्यामसुंदर या चित्रपटातील संगीत बापूरावांचेच होते. शांता आपटे यांचा प्रथम चित्रपट, सोबत होते अभिनेते शाहू मोडक. खाजगीवाले लिखित खलवधू, दाराआड, रजनी विलास इ. नाटकांत देखील त्यांनी संगीत दिले.
मैफलीचे गायक बापूराव...
बापूरावांचा आवाज रुंद, पल्लेदार, गाजदार असून त्यात विशेष गोडवा जाणवतो. या आवाजगुणांमुळे ते भास्करबुवांच्या गायकीच्या अधिकाधिक जवळ जाऊ शकले. मंद्र सप्तकातील पंचमापासून तार सप्तकातील मध्यमापर्यंत त्यांचा आवाज एकसारखा लागतो. कुठेही चोरटा आवाज लावण्याची गरज त्यांना भासत नाही. त्यामुळे आवाजात कोणत्याही प्रकारची कृत्रिमता जाणवत नाही. तसेच उत्तम दमसास असल्यामुळे स्वरवाक्यात सलगता जाणवते. त्यांच्या गायनात आस, मिंड, स्वरांची खेच, त्यांतील पीळ यांचा भरपूर वापर दिसून येतो. बखलेबुवांची स्थाई अंतरा भरण्याची जी खासियत होती, तीच खासियत बापूरावांच्या गाण्यात जाणवते. अतिशय चुस्तपणे स्थाई-अंतरा भरण्याच्या या गुणामुळे गाण्याच्या सुरुवातीलाच रंग भरला जातो.
ठाय लयीतील भास्करबुवांची गायकी जिचे अतिशय रसपूर्ण वर्णन केशवराव भोळे यांनी त्यांच्या पुस्तकात करून ठेवले आहे, तीदेखील बापूराव उत्तम मांडत. यमन, भूप, बिहाग, पूरिया, कामोद, छायानट हे राग ते उत्तम गात असत, असं त्यांना ऐकलेले जुने रसिक सांगतात. तसेच भास्करबुवांची गायकी ऐकायची असल्यास बापूरावांचे गाणे ऐकावे, असे जाणकार रसिक सांगतात. बापूरावांच्या गळ्यात नैसर्गिक तान फिरत होती. त्यामुळे बखले परंपरेतील बेहेलव्यांची, पल्लेदार तान, तार सप्तकातील स्वरावरून पटकन खाली येणे हे गायनविशेष भास्करबुवांच्या सर्व शिष्यांपैकी बापूरावांच्या गळ्यामध्ये सर्वोत्तम दिसून येते.
वरील सर्व गुण बापूरावांच्या उपलब्ध असलेल्या ध्वनीमुद्रिकांमध्ये ऐकावयास मिळतात. त्यांचे गाणे ग्वाल्हेरी वळणाचे दिसते. जयपूर, आग्रा इत्यादी घराण्यांचे रंग त्यांच्या गायकीत दिसत नाही. पलट्यांच्या अंगाने बांधलेल्या ताना त्यांच्या गायकीत दिसतात. भास्करबुवांचे शिषोत्तम मानले गेलेल्या मास्तरांच्या गाण्यातदेखील बापूरावांसारखी तान दिसत नाही. मास्तरांची तान छोट्या छोट्या नक्षीतून फुलत जाते, पण भास्करबुवांची दमसासयुक्त पल्लेदार तान बापूरावांच्या गळ्यात दिसते. खटके, मुरक्या, हरकती यांचा भरपूर वापर असला, तरी त्याचा अतिरेक जाणवत नाही. त्यामुळे ख्यालाचे ख्यालपण टिकून राहते.
या सर्व गुणव्यतिरिक्त एक गुण बापूरावांच्या गायनात फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे त्यांचा स्वरोच्चार. बापूरावांच्या सर्व ध्वनिमुद्रिकांत त्यांच्या या स्वरोच्चारामुळे एक खेळकरपणा, प्रसन्नता जाणवते. ज्याप्रमाणे उ. अब्दुल करीम खान यांच्या गायनात एक कारुण्याची झालर कायम दिसते, त्याप्रमाणे ही खेळकरपणाची किनार बापूरावांच्या गायनात आहे. डॉ. कुंटे यांनी त्याचे फार मार्मिक वर्णन केले. एखादा माणूस हसत हसत गायल्यास कसे होईल, ते बापूरावांच्या गायनात दिसते. त्यामुळे त्यांचा तोडी, मारवा अशा रागांच्या ध्वनिमुद्रिका ऐकताना देखील खूप गंभीर असे वातावरण निर्माण होत नाही.
राग दुर्गा - आज मिले नंदलाल सखी
बापूरावांचा प्रसन्न, खेळकर स्वरोच्चार संपूर्ण ध्वनिमुद्रणात प्रकर्षाने जाणवतो. पहिल्या अर्ध्या मिनिटांत अतिशय चुस्त स्थाई-अंतऱ्यामधून राग लगेच उभा राहतो. अंतऱ्यात जाताना बेमालूम लय वाढवत ते अंतऱ्याचा विस्तार करतात. तार सप्तकातील स्वरावरून झपाट्याने खाली येणे, बखले परंपरेतील बेहेलव्यांची पल्लेदार तान राग अधिक खुलवत जाते.

राग तोडी - बन रे घर काज
ध्वनिमुद्रणाच्या इतिहासातील पहिली आडा चौतालमधील रचना बापूरावांनी तोडी रागात दिली आहे. विस्तारातील सहजतेतून त्यांचे तालावरचे प्रभुत्व दर्शवते. इतर सर्व ध्वनिमुद्रिकांप्रमाणे तानफिरत उत्तम आहे. या ध्वनीमुद्रिकेत तानेचा आरंभबिंदू सारखाच ठेवून विविध प्रकारे केलेली तानेची बांधणी विशेष आहे.
राग बागेश्री - लेहो धाय धाय
बागेश्रीच्या गायनोच्चारातून बापूराव सुरुवातीपासूनच रागाची उत्तम पकड घेतात. रागाची भावावस्था प्रभावीपणे व्यक्त होण्यास पोषक अशी लय राखली आहे. १.१५ मिनिटांवर जुन्या ग्वाल्हेरच्या परंपरेप्रमाणे चढ्या गंधाराचा दर्जा ऐकायला मिळतो.

References:
History of Pune Bharat Gayan Samaj - Published by the Samaj
Purva Sukrut - Autobiography of Suhas Datar
Dev Gandharva - Biography of Pt. Bhaskarbua Bakhale
Image 3 - https://i.discogs.com/yOH-MKaVwVrBLzDCVfgNd15Pkd1u5eW3XaymsboRJio/rs:fit/g:sm/q:90/h:600/w:596/czM6Ly9kaXNjb2dz/LWRhdGFiYXNlLWlt/YWdlcy9SLTI3Mjg2/Njc3LTE2ODU4OTYy/MDAtMjU2Ni5wbmc.jpeg


Comments